भास्कराचार्यांची लीलावती
लीलावती या नांवाचा एक अत्यंत प्रसिद्ध गणितग्रंथ आहे. तो भास्कराचार्य नांवाच्या महाज्योतिष्यांनी केला. तो ग्रंथ गणितशास्त्राच्या संबंधाचा, तेव्हां त्यांतील विषयांची माहिती देण्याचें करमणुकीचे काम नव्हे आणि ते करण्याचा आमचा उद्देशही नाही. लीलावती हें नांव त्या गणितग्रंथास कां दिलें, याविषयींची कथा फार ध्यानांत ठेवण्याजोगी आहे म्हणून ती येथे देतो. त्या नांवाचा आणि भारतवर्षातील एका अत्यंत विदुषी स्त्रीच्या नांवाचा संबंध आहे.
महान् ज्योतिषी भास्कराचार्य यांस एक लीलावती नांवाची कन्या होती. ती गणित व ज्योतिष या दोन विषयांत इतकी पारंगत झाली होती, की तशी पारंगतता फारच थोड्यांस साधणार- मग ते पुरुष असोत वा स्त्रिया असोत. परंतु दिलगिरीची गोष्ट एवढीच, की तिचें आद्योपान्त जीवनवृत्त कोणीं कोठें लिहिलेलें नाहीं, आणि आतां त्याविषयी माहिती मिळणे शक्यही नाहीं. कोणत्याही संस्कृत अगर प्राकृत ग्रंथांत त्याची माहिती मिळत नाहीं. पुष्कळांनी त्या बाबतींत शोध केला परंतु त्यांस यावें तितकें यश आलें नाहीं. तथापि जी कांहीं थोडीबहुत माहिती उपलब्ध आहे, ती येथे देतों.
दिल्लीचा बादशहा अकबर याचे पदरी एक फैजल नांवाचा विद्वान् गृहस्थ होता, त्यानें बादशहाच्या संतोषासाठी एका ब्राह्मणाच्या घरीं आपण ब्राह्मण म्हणून राहून संस्कृत भाषेचें चांगलें अध्ययन केलें, आणि पुढे अनेक उत्तमोत्तम संस्कृत ग्रंथांची फारसी भाषेत भाषांतरें केलीं. त्यांतच भास्कराचार्यांच्या लीलावती ग्रंथाचेंही भाषांतर त्यानें केलें. त्या भाषांतरग्रंथाच्या उपोद्घातांत लिहिलें आहे की, भास्कराचार्य बेदरनगरनिवासी होता. लीलावती त्याची एकुलती एक कन्या. बापाचें तिच्यावर अत्यंत प्रेम. बाप महाज्योतिषी. त्यानें तिच्या जन्मकाळींच तिचें जातक तयार करून पाहिलें, तों एकंदर नक्षत्रगुणांवरून असे दिसलें की, मुलीच्या नशिचीं बालवैधव्य आहे. संतान वगैरे कांहीं नाहीं. ही मुलीची भावि स्थिति कळून भास्कराचार्यास अत्यंत दुःख झाले; व त्यामुळे त्यांच्या जिवास तो एक हृद्रोगच लागून राहिला. मुलीची वैधव्यदशा आपण कशी टाळावी याचा रात्रंदिवस त्यांना एकसारखा ध्यास लागला. तिच्या दैवी लिहिलेलें वैधव्य आपणास काही तरी उपायानें टाळतां येईल की नाहीं हा काय तो एकसारखा विचार.
होता होतां लीलावती उपवर झाली. भास्कराचार्यांनी विचार करितां करितां असा मुहूर्त शोधून काढिला की, त्या मुहूर्तावर लग्न झालें असतां लीलावतीस वैधव्य येण्याची मुळीच भीति नको. इतकेच नव्हे, तर ती अष्टपुत्रासौभाग्यवती होईल. विवाहदिवशी भास्कराचार्यांनी अनेक विद्वान् व चतुर लोकांस निमंत्रण करून त्यांचे समीप जांवई व मुलगी या उभयतांस बसवून लग्नमुहूर्ताचा काळ उत्तम प्रकारे कळण्यासाठी एका जलपूर्ण पात्रांत घटका घालून त्याजकडे पहात ते तटस्थ बसले. त्यांनी सर्वांस असें सांगितले, की घटकापात्र पूर्णपणे भरून बुडतांच कन्यादान करावें म्हणजे कन्येला येणारी वैधव्यदशा खात्रीनेच टळणार.
भास्कराचार्य कालाची अत्यंत सूक्ष्मपणे विवेचना व्हावी म्हणून मोठमोठ्या नामांकित पंडितांस व दैवज्ञांस तेथे बसवून आपण स्वतः एकसारखे त्या घटकापात्राकडे नजर देऊन राहिले होते. परंतु दैवाची गति किती विचित्र! लीलावतीला, बालस्वभावानें सहजच त्या घटकापात्राच्या अत्यंत सूक्ष्म छिद्रांतून पाणी कसें येत आहे हे पहाण्याची उत्सुकता झाली, व ती त्या जलपात्रावर डोकावून पाहूं लागली. इतक्यांत अकस्मात् तिच्या मस्तकावरील कांहीं दागिन्यांतून एक बारीक मोती जलबिंदूप्रमाणें त्या घटकापात्रात पडून पाणी येण्याच्या सूक्ष्म छिद्राच्या तोंडावर जाऊन बसले व पाणी येईनासे झालें. भास्कराचार्य व इतर पंडितजन घटका केव्हां बुडते आणि आपण 'सावधान' केव्हां म्हणतों अशा उत्सुकतेनें आपापल्या जागीं तटस्थपणे बसले होते. घटका बुडण्याची वेळ झाली असून अद्यापि ती बुडत नाहीं असा त्यांना थोड्याच वेळांत संशय आला. घटका अजून कां बुडत नाहीं, अजून कां बुडत नाहीं, असें करितां करितां घटकेचा बुडण्याचा काळ खात्रीनेंच टळून गेला असें वाटून सर्व मंडळी त्या ताम्रघटकेजवळ आली; व पाहूं लागली तों जल येण्याच्या छिद्रावर एक अतिशय सूक्ष्म मौक्तिक बसलेलें त्यांच्या दृष्टीस पडलें. घटका बुडण्याचा काल होऊन गेला हे खास ठरलेच. शेवटी आपणांस जो मुहूर्त अत्यंत इष्ट होता तो टळला, असें पाहून आणि
"शिरिं लिखित असे ते टाळण्या कोण शक्त"
असे म्हणून समाधान मानून आचार्यांनी दुसऱ्या मुहूर्तावर कन्येचा विवाह करून टाकला. नेमानेमाप्रमाणे लीलावती वैधव्यदुःखाग्नीनें दग्ध झाली. हें अरिष्ट आज नाहीं उद्यां आपणावर खास येणार, असें आचार्यांस पक्के कळून चुकलें होतें. तेव्हां तो प्रसंग येतांच त्यांनी धैर्य न सोडतां, आतां आपल्या प्रिय कन्येचें उरलेले आयुष्य उत्तम प्रकारें कसें जावें याच्या विचारास ते लागले. पतिपुत्रविहीन स्थितीत बालविधवांस दुसऱ्याच्या येथें पोळपाट लाटणे घेऊन जाऊन पोळ्या भाजण्यापेक्षां विद्यार्जन करून परमेश्वरभक्तींत व विद्यादानांत बालविधवांचा कालक्षेप होणें अत्यंत श्रेयस्कर, अशा मताचे भास्कराचार्य असल्यामुळे त्यांनी आपल्या प्रिय कन्येस विद्यासंपन्न करण्याचे योजिलें. त्यांनीं आपल्या मनाचे समाधान करण्यासाठी कन्येस म्हटलें, "मुली, पतिपुत्रादिकांच्या द्वारें केवळ कांहीं काळमात्र पृथ्वीवर नांव राहील; परंतु तुला मी अशी विद्यासंपन्न करितों व विशेषतः ज्योतिषशास्त्रांत अशी पारंगत करितों कीं, तुझें नांव या जगांत चिरकाल राहील." याप्रमाणे समाधान करून त्यांनी कन्येस अंकशास्त्र व ज्योतिषशास्त्र शिकविण्यास प्रारंभ केला. आणि संस्कृत भाषेत तिला चांगली निपुण करून तिच्या नांवानें एक अंकग्रंथ प्रसिद्ध केला. हा ग्रंथ केव्हां तयार झाला त्या ग्रंथात लिहिलें नाहीं. परंतु त्यांच्याच नक्षत्रनिर्णयकर्णकुतूहल नांवाच्या ग्रंथांत तो ग्रंथ शके ११०० साली लिहिला, असे लिहिलें आहे. भास्कराचार्य लीलावतीस प्रश्न करीत आहेत व लीलावती त्या प्रश्नांची उत्तरे देत आहे, अशा रूपानें तो ग्रंथ प्रश्रोत्तरयुक्त असा लिहीला आहे. या ग्रंथांत अंकगणिताचा जो अनुक्रम आहे तो अत्यंत सुंदर आहे. त्यांत प्रथमतः परिभाषेचें निरूपण करून क्रमाक्रमानें संकलन, व्याकलन, पूरण, हरण, वर्ग, वर्गमूल, घन, घनमूल इत्यादि अंकक्रम फारच सुबोध व अत्यंत उत्तम अशा नियमसूत्रांनी व उदाहरणांनी स्पष्ट केला आहे त्यामुळे अंकगणिताचीं आदितत्वें फारच सुलभ व हृदयंगम रीतीनें समजावून देतां येतात.
वाचकांनीं असें समजूं नये कीं, भास्कराचार्यांनी लीलावतीच्या नांवानें आपला उत्तमोत्तम ग्रंथ प्रसिद्ध केला, म्हणूनच लीलावतीचें नांव जगांत प्रसिद्ध आहे. लीलावती स्वतः अत्यंत विद्यासंपन्न होती व अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन शास्त्रांत तर ती फारच प्रवीण होती, इतकी की तिच्याविषयीं अद्यापिही एक आख्यायिका आहे, कीं ती एखाद्या झाडाच्या खाली बसली असल्यास फारच थोड्या वेळांत त्या झाडाची पानें, फळे, फुलें व डाहाळ्या किती आहेत याची गणना बरोबर करीत असे.